माजी कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य आजही प्रेरणादायी : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

अमरावती, दि. २७ डिसेंबर – माजी कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख (भाऊसाहेब) यांच्या विचारांचा वारसा श्री शिवाजी शिक्षण संस्था यशस्वीपणे पुढे नेत आहे. भाऊसाहेब यांचे व्यक्तिमत्व विदर्भवासियांसाठी कायमच प्रेरणादायी आहे. त्यांनी संत गाडगे महाराज यांच्या समाजसेवेच्या कामातून प्रेरणा घेत आपले जीवन कायमच आचरणात आणले. शिक्षण, शेती, ग्रामविकास आदी क्षेत्रांतील त्यांचे काम खूप मोठे आहे. त्यांच्याच प्रयत्नातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. ‘भूतकाळ विसरा, जातीभेद पुरा’ या त्यांच्या शिकवणीनुसार संस्थेचे आजही कार्य सुरू आहे. या संस्थेत सर्व जात, धर्माचे विद्यार्थी एकत्र शिक्षण घेतात,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित माजी कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२४ व्या जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) श्री प्रमोद येवले आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “शिक्षणासह कृषी क्षेत्रासाठी आणि शेतकर्‍यांसाठी देखील भाऊसाहेब यांनी क्रांतिकारी कार्य केले. मात्र, ते समाजापुढे येण्यास बराच काळ लागला. भाऊसाहेबांच्या चौफेर व्यक्तिमत्वामध्ये त्यांच्या कामाचा आवाका किती मोठा होता, हे आपल्याला आता समजून येते. अशा थोर व्यक्तिमत्वाचे समाजकार्य पुढील पिढीसाठी कायमच प्रेरणादायी आहे. त्यामुळे भाऊसाहेब यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार झाल्यास त्याचे प्रत्येक पैलू नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरतील.”

“देशाचे कृषी मंत्री झाल्यानंतर भाऊसाहेबांनी शेतकरी सुखी, समृद्ध व्हावा, यासाठी या क्षेत्रात खूप काम केले. यातून प्रेरणा घेत ते पुढेदेखील होत राहण्याची आवश्यकता होती. मात्र, आजची ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता त्यानंतर प्रगती आणि विकासाचा वेग वाढू शकलेला नाही. आज देशाच्या जीडीपीत कृषी क्षेत्राचा केवळ १२ टक्के वाटा आहे. यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतर होत आहे. हे थांबवायचे असेल आणि ग्रामीण भागाचा विकास साध्य करायचा असल्यास या विकासाचा दर २० टक्क्यांवर जाण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची आवशकता आहे. तेव्हाच अन्नदाता शेतकरी सुखी आणि समृद्ध होईल. हीच भाऊसाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *