नागपूर, दि. २५ डिसेंबर – “आपल्याकडे खूप थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या विचारांतून समाजाला योग्य दिशा देण्याचेच काम केले आहे. पूजनीय गुरू घासीदास बाबाजी यांनी देखील ‘सत्य हाच मानवाचा खरा दागिना आहे’, हा विचार दिला. त्यामुळे या विचारांवर विश्वास ठेऊन काम करत राहणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील पूजनीय गुरू घासीदास बाबाजी यांच्या जयंतीनिमित्त मिनीमाता नगरमधील गुरू घासीदास गुरुद्वारा प्रांगण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार श्री कृष्णाजी खोपडे, नगरसेवक श्री प्रदीपजी पोहाडे, श्री नरेंद्रजी बघेल यासह आयोजन समितेचे सभासद आणि समाजबांधव उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “पूजनीय गुरू घासीदास बाबाजी यांचे विचार आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांवर आयुष्यात वाटचाल करत राहिल्यास जीवनाचे कल्याणच होईल. समृद्ध, संपन्न जीवन जगण्यासाठी मदतच होणार आहे. आपल्या संस्कृतीत विश्वाच्या कल्याणाचा विचार दिला आहे. त्यामुळे केवळ स्वतःच्या विकासाचा विचार न करता सर्व मानवतेचा विकास कसा होईल, यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.”