नागपूर, दि. २४ डिसेंबर – “भारताची आज आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, असे असताना त्याचा केंद्रबिंदू मजदूर, गरीब आणि शोषित असावा. कारण त्यांना डावलून कधीही संपूर्ण विकास होऊ शकत नाही,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केले.
नागपूर येथे आयोजित श्री व्ही. एस. जोग लिखित ‘यश-अपयश’ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. वेदप्रकाश मिश्रा, पुस्तकाचे लेखक व्ही. एस. जोग, साहित्य संघाचे अध्यक्ष दाते आदी उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “देशातील ६० टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते. तेथील जनतेला चांगले रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगार नसल्यामुळे नाईलाजास्तव शहराकडे वळावे लागत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १२ ते १४ टक्के आहे. हे प्रमाण जोपर्यंत ३० टक्क्यांपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत ग्रामीण भागातील नागरिक सुखी होऊ शकणार नाही. हे थांबवायचे असल्यास त्यांना गावातच सर्व सुविधांसह रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. याशिवाय, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन होण्याची गरज आहे. ज्यामुळे शेतीमध्ये सुधारणा होण्यासह पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.”
“स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व यांच्या बाबतीत समाजात अनेक गैरसमज आहेत. सावरकर यांचे हिंदुत्व सकारात्मक, सर्वसमावेशक आणि सहिष्णू होते. त्यांनी आपल्या विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे कितीही अडचणी आल्यातरी आपल्या विचारांवर प्रामाणिकपणे श्राद्ध ठेवणे गरजेचे आहे.”