व्यवसाय वाढीसाठी विश्वासार्हता महत्त्वाची : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

कल्याण (जि. ठाणे), दि. २३ डिसेंबर – “येणाऱ्या काळात आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होणार आहे. यात टिकून राहण्याचे सर्वांत मोठे आव्हान व्यावसायिक संस्थांसमोर आहे. मात्र, प्रामाणिकपणा, सचोटी, संस्कार, समर्पित भावना, देशभक्ती आणि दायित्व यासह व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन कार्य केल्यास लोकांचा विश्वास संपादन करून पुढे जात राहणं कठीण नाही,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

कल्याण (जि. ठाणे) येथील कल्याण जनता सहकारी बँक लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे प्रांत संघचालक श्री डाॅ. सतीशजी मोढ, बँकेचे अध्यक्ष श्री सीए सचिनजी आंबेकर, आमदार श्री गणपतजी गायकवाड, माजी आमदार श्री नरेंद्रजी पवार, पोस्टमास्टर जनरल श्री गणेशजी सावळेश्वरकर यांच्यासह बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील सहकार क्षेत्र यशस्वी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या क्षेत्रावर असलेला विश्वास. त्यामुळे लोकसेवा, सामाजिक हिताचा विचार करून व्यवसाय केल्यास तो अपयशी ठरत नाही. त्याचसोबत व्यवसाय वाढीसाठी काळानुरूप बदल करत राहणे देखील आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड व्यवसायास मिळाल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करत असताना योग्यवेळी योग्य निर्णय घेणेदेखील आवश्यक आहे. ज्याला याची किंमत नाही कळणार तो कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *