भाईंदर (ठाणे), १७ डिसेंबर – “ज्ञान ही यशाची गुरुकिल्ली आहे. ज्ञानाच्या आधारेच एक चांगला विद्यार्थी समृद्ध आणि संपन्न व्यक्ती होऊ शकतो. त्यामुळे आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व काय आहे, हे समजणे आवश्यक आहे. हे ज्याला कळले, त्याला यशाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही”, असे विचार केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केले.
भाईंदर (जि. ठाणे) येथील राम रत्न विद्या मंदिरच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी रामेश्वरलालजी काबरा, रत्नादेवी काबरा, संस्थेचे व विद्यालयाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “ज्ञान ही शक्ती आहे. ते आपल्या जीवनात सतत मिळवत राहणे आवश्यक आहे. यासोबतच नवकल्पना, उद्योजकता, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन केवळ हेच ज्ञान नसून ते अमर्याद आहे. त्यामुळे एकाच विषयावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान आत्मसात करत राहायला हवे. यशस्वी होण्यासाठी आपल्या ज्ञानावर, व्यवसायावर विश्वास ठेवून काम करत राहणे गरजेचे आहे. त्याचसोबत ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करता यायला हवे. यातच देशाचे भविष्य आहे. शिक्षणसंस्थांनी आपल्या संस्थांमधून शैक्षणिक ज्ञान देण्यासोबतच संस्कारक्षम नागरिक घडवण्यावर देखील भर दिला पाहिजे. तरच ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, संस्कृती, परंपरा यांच्यासोबतच मूल्याधिष्ठित जीवनपद्धती आणि चांगुलपणाचा वापर करून एक आदर्श पिढी घडू शकेल. एखादी व्यक्ती विद्वान तेव्हाच ठरते, जेव्हा ती आपल्या ज्ञानाचा इतरांना घडवण्यासाठी वापर करते. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा इतरांनाही कसा फायदा होईल, हे पाहणे आवश्यक आहे.”