नागपूर, ११ डिसेंबर – “रेल्वे मंत्रालय विदर्भात राबवत असलेल्या ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पामुळे येथील प्रादेशिक वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. देशातील पहिलाच हा प्रकल्प असल्याने यामुळे विदर्भाच्या विकासालाही गती मिळणार आहे. यामुळे माफक तिकीट दरात वातानुकूलित, आरामदायी प्रवास करता येणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर मेट्रो फेज १, समृद्धी महामार्गासह विविध विकासकामांचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दि. ११ डिसेंबर रोजी लोकार्पण झाले. यानिमित्त, टेम्पल ग्राउंड, एम्स येथे आयोजित कार्यक्रमात श्री गडकरीजी बोलत होते. यावेळी महामहीम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी, राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारतीजी पवार, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “अर्बन ट्रान्सपोर्ट सिस्टिमला रिजनल ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये रूपांतरित करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मेट्रो आणि ब्रॉडगेजच्या उपलब्ध पायाभूत सुविधांचा उपयोग यासाठी होणार आहे. ही ब्रॉडगेज मेट्रो नागपूर येथून अमरावती, चंद्रपुर, गोंदिया, छिंदवाडा, बैतूल, रामटेक या मार्गांवर धावणार आहे. मेट्रोसाठी प्रतिकिलोमीटर ३०० करोड रुपये खर्च येतो, मात्र ब्रॉडगेज मेट्रोसाठी प्रतिकिलोमीटर ४ करोड रुपये खर्च आहे. ‘पब्लिक प्रायव्हेट सेक्टर’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.”
“महाराष्ट्रात नवीन ६ नवीन एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार आहेत. ७५ हजार करोड रुपये खर्चाच्या या ग्रीन एक्सप्रेस वेमुळे येथील विकासाला गती मिळणार आहे. पुणे ते औरंगाबाद या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. दक्षिणेकडून उत्तर भारतात जाणारी सर्व वाहतूक सध्या मुंबई, पुणे मार्गे जाते. यामुळे या दोन शहरांवर वाहतुकीचा मोठा बोजा येतो. तसेच प्रदूषणातही वाढ होते. मात्र, सुरत ते चेन्नई महामार्गामुळे हा प्रश्न मिटणार आहे. हा महामार्ग सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि पुढे दक्षिण भारतातील महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे. याशिवाय, इंदोर ते हैदराबाद, हैदराबाद ते रायपुर हे मार्गदेखील महाराष्ट्रातून जाणार आहेत. तसेच, नागपूर ते विजयवाडा आणि पुणे ते बेंगळुरू या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.”
“अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमुळे (एम्स) विदर्भ, मराठवाडा आणि छत्तीसगड येथील रुग्णांना फायदा होणार आहे. त्यांना अद्ययावत रुग्णसेवा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच ‘आयआयएम’मुळे येथील शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. दरम्यान, नागपूर मेट्रो भारतातील एकमात्र प्रकल्प आहे ज्याची गिनीज बुक रेकॉर्ड आणि आशियाई बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याशिवाय, देशातील सर्वांत वेगाने काम सुरू असणारा हा प्रकल्प आहे.”