नागपूर, ८ डिसेंबर – “भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न होणे आवश्यक आहे. यात ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ची भूमिका महत्त्वाची आहे. आज भारताकडे भविष्यातील अर्थव्यवस्था म्हणून संपूर्ण जग पाहात आहे. भारत सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असण्यासोबतच प्रतिभावान युवाशक्तीचाही देश आहे. हीच नव्या भारताची संपत्ती आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) द्वारे आयोजित ‘जागतिक आर्थिक धोरण शिखर परिषद २०२२’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष श्री उदय कोटक, ‘डीजीसीआय’चे श्री चंद्रजीत बॅनर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “आर्थिक महासत्ता आणि देशाच्या शाश्वत विकासासाठी अनुकूल वातावरण तयार होणे आवश्यक आहे. यासाठी देशांतर्गत व्यवसाय वाढीसोबतच परदेशी गुंतवणुकीलाही प्रोच्छाहन मिळणे आवश्यक आहे. मजबूत पायाभूत व्यवस्था देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहेत. याच दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘पीएम गतीशक्ती’ अंतर्गत उद्योगांना आवश्यक सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे उद्योगांचा पैसा आणि वेळ वाचणार आहे. तसेच, केंद्र शासनाकडून उद्योगांसाठीच्या पायाभूत सुविधांसाठी १११ लाख करोड रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांवर एखाद्या भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. याच दृष्टीने आपले वेगाने प्रयत्न सुरू आहेत. २०२५ पर्यंत २ लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न असून एन्टर मॉडेल स्टेशन्स, देशांतर्गत ६०० बस पोर्ट तयार झाल्यानंतर वाहतुकीची समस्याही सुटणार आहे. याशिवाय, भारतमाला परियोजनेअंतर्गत तयार होत असलेल्या २७ ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे, ३५ मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क आणि २६० रोपवे केबल कार, फिनोक्युलर रेल्वे प्रकल्पांमुळे संकल्पपूर्तीला आणखी बळ मिळणार आहे.”