नागपूर, २८ नोव्हेंबर – “नॉलेज ही पॉवर आहे. या शक्तीचा आपल्या जीवनात अवलंब केल्यास आयुष्य सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. ‘ॲग्रो व्हिजन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना भविष्याचा वेध घेऊन कोणत्यापध्दतीने शेती करायला हवी, याविषयी मिळालेल्या माहितीचा त्यांनी त्यांच्या जीवनात अवलंब केल्यास एकरी उत्पन्न वाढण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित ‘ॲग्रो व्हिजन -२०२२’ कृषी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, अरुणाचल प्रदेशचे कृषी मंत्री तगे तकी, माजी केंद्रीय मंत्री श्री हंसराजजी अहिर, माजी खासदार श्री विकासजी महात्मे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले,”ॲग्रो व्हिजन’च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ३० ते ३६ वर्कशॉपद्वारे मिळालेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना व्यवसाय वाढविण्यासाठी फायदा होणार आहे. तसेच, फवारणीसाठी ड्रोनचा वापर कसा करावा, एकेरी उत्पादन वाढवण्यासाठी काय करायला हवे आणि टेस्टट्यूब गोरी या भविष्यातील तंत्रज्ञानाविषयीच्या माहितीचे ते इतरांसोबतही आदान-प्रदान करतील. या तंत्रज्ञानामुळे उत्पन्न वाढून शेतकरी कर्जमुक्त होतील. तरुणांच्या हाताला काम मिळेल, स्मार्ट शहरांप्रमाणे गावेही स्मार्ट होतील आणि शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावेल.”