नागपूर, २६ नोव्हेंबर – विदर्भासह राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखणे गरजेचे आहे. यामुळे व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचे उत्पन्न वाढून खऱ्याअर्थाने त्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध होईल. तसेच हे धोरण आखतांना यात पर्यावरपूरक बाबींचा समावेशक असणे महत्त्वाचे आहे. यात डीझेलऐवज इलेक्ट्रिक किंवा इथेनॉलवरील बोट वापराला प्रोच्छाहन दिल्यास व्यावसायिकांच्या खर्चात बचत होण्यासह पर्यावरणाचे रक्षण आणि नवीन रोजगार निर्माण होतील,” असे आवाहन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी केले.
नागपूर येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन -२०२२’ कृषी प्रदर्शनांतर्गत आयोजित ‘विदर्भातील मत्स्यव्यवसाय विकास’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी फिशरीज विभागाचे सचिव श्री अतुल पाटणे, भंडारा-गोंदियाचे खासदार श्री सुनील मेंढे, डॉ. आशिष पातुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी म्हणाले, “महाराष्ट्रासह विदर्भातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी स्थानिक माल बाहेरील देशांतही निर्यात होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच, यात मत्स्य खत तयार करण्यासाठी विद्यापीठांची मदत घेतल्यास खत टंचाईवर मत करता येऊ शकेल. त्यामुळे यात संशोधन होण्यास प्रशिक्षण देण्यासाठी माध्यम विकसित होईल आणि खताची विक्री, उत्पन्न वाढविण्यासाठी याचा उपयोग होईल. बाहेरील देशात मासळीला मोठी मागणी आहे. त्यामुळे स्थानिक मालाची चांगली पॅकेजींग करू निर्यात केल्यास येथील व्यावसायिकांना परदेशी मार्केट उपलब्ध होईल. यात खासगी संस्थांनाही सहभागीकरून घेतल्यास मालाची पॅकेजिंग, निर्यात आणि विक्रीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. खास करून आपल्या पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना याचा फायदा होऊ शकेल. यामुळे मत्स्य व्यावसायिकांच्या मालाला मागणी वाढण्यासह भावही मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल, याचा विचार होणे गरजेचे आहे.”