कुठलीही गोष्ट साध्य करायची झाल्यास योग्य मार्गदर्शन आवश्यक : केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी

नागपूर, २६ नोव्हेंबर – “कुठलीही गोष्ट साध्य करायची असल्यास त्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. मात्र, आपल्याकडे त्याचाच जास्त अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपण ठरवलेले उद्दिष्ट साध्य करू शकत नाहीत. स्पेनमध्ये एक शेतकरी एकरी ९० टन उत्पादन घेतो. तेच आपल्याकडे ८ ते १० टनापर्यंत समाधान मानावे लागते. त्यामुळे सर्वांत आधी आपले ७५ टन संत्र्याचे उत्पादन कसे होईल हे उद्दिष्ट ठेवायला हवे. मग आपण ते साध्य करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधायला लागतो,” असा सल्ला केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी दिला.

नागपूर येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन -२०२२’ कृषी प्रदर्शनांतर्गत आयोजित ‘तंत्रज्ञानाने संत्रा व मोसंबी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्री अनिल भोंडे, श्री श्रीधरराव ठाकरे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी म्हणाले, “प्रत्येक शेतकऱ्याने आपले उत्पादन का कमी आहे आणि ते वाढवण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा आधारही घ्यायला हवा. याशिवाय, शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी उत्तम प्रतीचे रोप कसे उपलब्ध करून देता येईल, याचाही विचार होणे गरजेचे आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नर्सरीज निर्माण होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास मालाचा दर्जा वाढेल. आपल्याकडे फळाचा केवळ ज्यूस म्हणून विचार होतो. त्याऐवजी ‘टेबल फ्रुट’ म्हणजे कडवट, आंबट आणि गोड फळ लोकांना आवडल्यास त्याला मागणी वाढेल. त्यामुळे उत्तम रोप लागवडीवर भर द्यायला हवा. त्यासाठी संशोधन करून उत्तम रोप तयार करणाऱ्या नर्सरी आवश्यक आहेत. याशिवाय, चांगली जमीन, कलम यासोबतच मालाच्या विक्रीसाठी चांगली मार्केटिंगही गरजेची आहे. त्यासाठी ब्रॅण्डिंगही तेवढीच महत्त्वाची आहे. तसे झाल्यास चांगलं प्रॉडक्ट तयार होईल आणि  त्याला मोठं मार्केट मिळेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *