नागपूर, २४ नोव्हेंबर – “ज्याला आपल्यातील कमतरता आणि सामर्थ्य या दोन गोष्टी कळाल्या तो जीवनात नक्की यशस्वी होतो. येणाऱ्या काळात आपल्याला रासायनिक शेतीपासून मुक्ती मिळवायची आहे आणि हे काम कठिण वाटत असले, तरी ते अशक्य नाही. त्यासाठी आपल्याला योग्य दृष्टी ठेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. त्या दिशेने सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास आपण नक्की यशस्वी होऊ”, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला.
नागपूर येथील श्री विश्व समर्थ व्हिलेज फाउंडेशनद्वारे आयोजित कृषी व्यवस्थापन शिबिराचे आज केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गोंडखैरी येथील रिजनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग येथे आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री गडकरीजी पुढे म्हणाले, “कोणतीही व्यक्ती परफेक्ट नसते, मात्र मनात ठाम निश्चय करून एखादी गोष्ट मिळवण्याच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते. त्याला जर नॉलेज आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली, तर ते आणखी सोपे होते. मात्र, तंत्रज्ञान हे नेहमी बदलत असते, त्यामुळे नेहमी अपडेट राहणेदेखील महत्त्वाचे आहे.”