नागपूर, २३ नोव्हेंबर – “एखादी चांगली कल्पना करावी आणि ती साकार करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीनंतर ती जेव्हा नावारूपाला येते, तो क्षण विलक्षण असतो. यावर आपली श्रद्धा आणखी वाढली पाहिजे, यासाठी फुटाळा तलावात साकारलेली ही सुंदर आणि भव्यदिव्य कलाकृती सर्वांनीच अवश्य पहावी. या सुंदर कलाकृतीमुळे आज खऱ्याअर्थाने नागपूर जगाच्या नकाशावर आले आहे,” अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प. पू. सरसंघचालक श्री. मोहनराव भागवत यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूरात उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या फुटाळा कारंजे व वॉटर शोचा उद्घाटनपूर्व प्रात्यक्षिक सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहिला. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, सरकार्यवाह श्री.दत्तात्रय होसबळे, सहसरकार्यवाह श्री. कृष्ण गोपाल, श्री. मनमोहन वैद्य, श्री. अरुण कुमार, श्री. मुकुंद जी, श्री. रामदत्त जी आणि श्री. सुरेश सोनी, श्री. भागय्या जी यांच्यासह वरिष्ठ प्रचारक आणि अधिकारी उपस्थित होते.
नागपूरातील फुटाळा तलावावरील सर्वात मोठ्या म्युझिकल फाउंटनच्या पाण्याने बनणाऱ्या पडद्यावर श्री. अमिताभ बच्चन, श्री गुलजार आणि श्री. नाना पाटेकर यांच्या आवाजात देशाच्या स्वातंत्र्याचा आणि नागपूरचा इतिहास प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.
प. पू. सरसंघचालक श्री. मोहनराव भागवत म्हणाले, “नागपूरकरांची देशभक्ती, चळवळ आणि रोकठोकपणा हा प्रसिद्ध आहे. मात्र, आता त्यांच्या कल्पनेतून साकार झालेली ही सुंदर आणि भव्य कलाकृती संपूर्ण जगाला पाहण्यास मिळणार आहे. फुटाळा कारंजाची भव्यता आणि कल्पकता पाहण्यासाठी जगभरातून नागरिक येतीलच, मात्र त्याआधी प्रत्येक नागपूरकरांनीही तो अवश्य पहावा,” असे आवाहन त्यांनी केले.