अहमदनगर, १९ नोव्हेंबर – “अहमदनगर जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणात रस्त्याचे जाळे विकसीत होत आहे. आता सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट आणि चेन्नई या उत्तर भारताला दक्षिणशी जोडणाऱ्या नवीन १६०० किलो मीटर लांबीच्या ग्रीन एक्सप्रेसवेमुळे अहमदनगर खऱ्याअर्थाने देशाच्या नकाशावर येणार आहे,” अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केली.
अहमदनगर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील ३.०८ कि.मी. लांबीच्या नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दि. १९ नोव्हेंबर रोजी झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील, श्री खासदार सुजय विखे पाटील, खासदार श्री सदाशिव लोखंडे, माजी मंत्री श्री राम शिंदे, आमदार श्री बबनराव पाचपुते, आमदार श्री संग्राम जगताप, श्री शिवाजीराव कर्डिले, श्री स्नेहलता ताई कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
जवळपास ३३१ करोड रुपये खर्चाच्या आणि ४-लेन एलिव्हेटेड स्ट्रक्चर असलेल्या या उड्डाणपुलामुळे शहरातील स्थानिक वाहतूक व राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक विभागली जाऊन सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी सुटका होणार आहे. तसेच, सुरक्षित वाहतुकीसह प्रवासाचा वेळही वाचणार असून इंधनातही बचत होणार आहे.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले, “सुरत ते चेन्नई ग्रीन एक्सप्रेस वे हा मुंबई ते दिल्ली या नव्याने करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रीन हायवेशी जोडण्यात येणार आहे. यापूर्वी उत्तर भागातील राज्यातून चेन्नईला जाणारी वाहतूक मुंबई किंवा पुणेमार्गे सोलापूर आणि कोल्हापूर येथून जात होती, ती आता अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात नगर हे लॉजिस्टिक कॅपिटल झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच, या भागाचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनाही या रस्त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय उद्योग व्यवसाय आल्याने रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले, “केंद्रीय मंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी जिल्ह्यात २०२ किलो मीटरचा राष्ट्रीय महामार्ग होता. मात्र आज त्यात वाढ होऊन ८६९ किली मीटरचा झाला आहे. ज्यात ४३१ टक्क्याने वाढ झाली आहे. तसेच मागच्या ८ वर्षांत ३६ रस्त्यांची कामे मंजूर आहेत. यापैकी काही पूर्ण झाली असून काही प्रगती पथावर आहेत.”
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले, “पुणे ते औरंगाबाद असा अहमदनगर मार्गे जाणारा रस्ता सध्या खूप अडचणींचा ठरत आहे. त्यामुळे आता नवीन सहा पदरी नवीन ग्रीनफिल्ड हायवेच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते औरंगाबाद प्रवास अडीच तासांवर येणार आहे. तसेच हा महामार्ग औरंगाबादजवळ समृद्धी महामार्गाला जोडल्यामुळे नागपूरपर्यंतचा प्रवास जलद आणि सुरक्षित होणार आहे,” असेही ते म्हणाले.