नागपूर, १३ नोव्हेंबर – देहू ते आळंदी, देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर असा मोठा पालखी मार्ग बांधण्याची मला संधी मिळाली, हे माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले काम मी समजतो. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला टाईल्समध्ये गवत लावल्यामुळे पायी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांचे पाय भाजणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. १२ हजार कोटी रुपये खर्चून हा ‘भक्ती मार्ग’ तयार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांच्या आईच्या स्मरणार्थ आयोजित महिला आणि पुरुष भजन स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते. नागपूर येथील जवाहर विद्यार्थी गृहातर्फे या स्पर्धेचे आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. कृष्णाभाऊ खोपडे, जवाहर विद्यार्थीगृहाचे रमेश किर्डे, कार्यक्रमाचे आयोजक शंकरराव गायधने, चेतनाताई सातपुते आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत गाडगे महाराज यांनी आपल्या विचारातून, भजनातून अगदी सध्या शब्दात आपल्याला देवाचे दैवत आणि जीवनाचा मार्ग सांगितला आहे. या भजनाच्या रुपाने एक संस्कार प्राप्त झाला आहे. आजही गरिबाच्या घरीदेखील रात्री भजन, कीर्तन या संस्काराने आपला परिवार आणि आपले घर समृद्ध आणि संपन्न केले आहे. भजन कीर्तन हे एक सांस्कृतिक यज्ञ आहे. त्यामुळे आपण या संस्कृतीचे जतन करण्यासाठी भजन, कीर्तन स्पर्धा आयोजित करूया. जेणेकरून आपली संस्कृती, इतिहास आणि त्यातून मिळणारे संस्कार यातून मिळणाऱ्या आपल्या संतांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध करता येईल, असे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी आवाहन केले.