नागपूर, दि. ५ मे – नागपूरमधील विविध विकासकामांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रवीभवन येथे शुक्रवारी (दि. दि. ५ मे) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून शहरात करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांसह जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत हलबा समाजाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी कामकाजात येणाऱ्या अडचणींबाबत श्री गडकरीजी यांनी यावेळी माहिती घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.


बैठकीस आमदार श्री प्रवीणजी दटके, आमदार श्री कृष्णाजी खोपडे, आमदार श्री मोहनजी मते, आमदार श्री विकासजी कुंभारे यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. रेशीमबाग मैदानाचा विकास, स्वदेश दर्शन योजनेंतर्गत वाकी, धापेवाडा, पारडसिंगा व गिरड तीर्थक्षेत्रांचा विकास, परमात्मा एक सेवक प्रकल्प, वर्धमान नगर येथील आयनॉक्स, बिग बझार प्रकल्पाबाबत नियोजन, पश्चिम आणि उत्तर नागपूरांतील रस्त्यांची कामे, पूनापूर – भरतवाडा येथील वीट भट्टी प्रकल्प, नागपूर सुधार प्रन्यास नवीन इमारत तसेच नासुप्रच्या व्यावसायिक कॉम्प्लेक्स यासह इतर प्रकल्पांच्या विकासकामांचा आढावा यावेळी श्री गडकरीजी यांनी घेतला. दरम्यान, हलबा समाजाच्या कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या.

